वणी :-
येथील शतकमहोत्सवी नगर वाचनालयात 37 व्या वर्षीची दोन दिवसीय हेमंत व्याख्यानमाला संपन्न झाली आहे. या व्याख्यानमालेत पहिल्या दिवशी शककर्ते शिवराय हा विषय पुणे येथील शिवशंभू प्रतिष्ठानचे अक्षय चंदेल यांनी मांडला. दुसऱ्या दिवशी जळगाव येथील प्रसिद्ध वक्ते रविंद्र पाटील यांनी शापित राजहंस छत्रपती संभाजी महाराज हा विषय मांडला.
वणी शहरात नगर वाचनालय द्वारा मागील 36 वर्षापासून प्रतिष्ठेची हेमंत व्याख्यानमाला सुरू आहे. या व्याख्यानमालेच्या पहिल्या पुष्पाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र ग्रंथालय संघाचे अध्यक्ष गजानन कोटेवार हे होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. दिलीप अलोणे व माधव सरपटवार उपस्थित होते.
स्नेहलता चुंबळे यांच्या छ. शिवाजी महाराजांवरील वैयक्तिक गीतांनतर मुख्य वक्ते अक्षय चंदेल यांनी शककर्ते शिवराय हा विषय मांडताना शिवपूर्व महाराष्ट्रापासून निजामशाही, आदिलशाही व मोगलांनी केलेले अत्याचाराचे चित्र उभे करून शिवरायांनी स्वतः च्या बळावर हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. याचा रोमहर्षक इतिहास त्यांनी उभे करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
याप्रसंगी विदर्भ साहित्य संघ वणी शाखेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावर डॉ. दिलीप अलोणे यांनी उपस्थितांना माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात डॉ. गजानन कोटेवार यांनी मागील 36 वर्षापासून नगर वाचनालयाने व्याख्यानाचा परंपरा कायम राखल्याबद्दल वाचनालयाचे कौतुक करून ग्रंथालय चळवळ मजबूत करण्यासाठी सर्वोतरी योगदान देण्याची तयारी दाखविली. पहिले पुष्प प्राचार्य राम शेवाळकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ विदर्भ साहित्य संघ वणी शाखेकडून प्रायोजित करण्यात आले होते.
या व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प जळगाव येथील प्रसिद्ध वक्ते रविन्द्र पाटील यांनी ' शापित राजहंस' छ. संभाजी महाराज हा विषय मांडला. या प्रसंगी अध्यक्षस्थानी डॉ. दिलीप अलोने हे होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार, वणी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष राकेश खुराणा हे उपस्थित होते. संजिवरेड्डी बोदकूरवार व राकेश खुराणा यांनी या व्याख्यानमालेत हजेरी लावलेल्या महाराष्ट्रातील नामवंत वक्त्याचा उल्लेख करून आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले. समाज प्रबोधनासाठी व्याख्यानात घेतलेल्या विषयाची विशेष स्तुती करून समाजाला या थोर पुरुषांच्या इतिहास माहित होणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले.
तेजस्विनी गव्हाणे या विद्यार्थिनीने संभाजी महाराजांवरील पोवाडा सादर केल्यानंतर शापित राजहंस छ. संभाजी महाराज हा विषय मांडताना रविंद्र पाटील यांनी शिवाजी महाराजांनी किती महत्प्रयासाने स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य त्यांच्या निर्वानानंतर कशी स्थिती निर्माण झाली. याचे वर्णन करून राज्याभिषेकानंतर सतत युद्ध करून 8 वर्षाच्या काळात 128 युद्ध जिंकणारे संभाजी महाराज हे एकमेव राजे होते. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्याच्या स्थितीचे वर्णन करून आदिलशाही, निजामशाही व मोघलांशी कशी यशस्वी झुंज दिली यांचे वर्णन करून राष्ट्रधर्मासाठी या शापित राजहंसाने बलिदान दिल्याचे वर्णन श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेणारा होता.
अध्यक्षीय भाषणात डॉ. अलोने यांनी संभाजी महाराजांच्या जीवनातील संघर्षावर प्रकाश टाकला. दुसरे पुष्प स्व. रमेश उंबरकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ नितीन रमेश उंबरकर यांनी प्रायोजित केले होते.
या दोन्ही पुष्पाचे प्रास्ताविक नगर वाचनालयाचे अध्यक्ष माधव सरपटवार यांनी केले. सूत्रसंचालन वाचनालयाचे सचिव गजानन कासावार यांनी केले. आभार प्रदर्शन वणी विं. सा. संघाचे सचिव प्रा. अभिजीत अणे व हरिहर भागवत यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वाचनालयाचे उपाध्यक्ष विश्वेश्वर झाडे, संचालक अनिल जयस्वाल, अर्जुन उरकुडे, ग्रंथपाल देवेंद्र भाजीपाले, प्रमोद लोणारे, राम मेंगावार , सुनीता राठोड यांनी परिश्रम घेतले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या